कर्करोगावरील उपचार सुसह्य करणारी ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ उपचार पद्धती

एखाद्याला कर्करोग झाल्याचे समजले की तो केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेच्या कल्पनेने आणि ते उपचार घेत असताना असह्य वेदना होणार या भीतीनेच अधिक भेदरून जातो. या असह्य वेदना कमी होण्यासाठी आणि रुग्णासह उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही शरीरातल्या असामान्य पेशींची गाठ (ट्यूमर) काढून टाकणे सोपे व्हावे यासाठी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी तंत्रज्ञान पुढे सरसावले आहे.

शरीरातल्या कॅन्सरच्या गाठीला, विशेषतः यकृतावरील गाठींना, मोठ्या प्रमाणावर रक्त पुरवठा होत असल्याने त्यांची संख्या अनियंत्रित पद्धतीने वाढत राहते. हा रक्तपुरवठा थांबविल्यास त्या गाठींना काढून टाकणे कोणत्याही कर्करोगतज्ज्ञाला सहज शक्य होते. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात तसे करता येते.

इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. मुकुल मुटाटकर म्हणाले, “सध्या प्रचलित असलेल्या पद्धतींमध्ये शरीरातला कॅन्सर गाठींच्या भागावर केमोथेरपी किंवा रेडिएशनद्वारे उपचार करताना शरीराच्या अन्य भागावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रुग्णाला असह्य वेदना होत राहतात. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टच्या सहाय्याने व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता शरीरातल्या कॅन्सरच्या गाठींना होणारा रक्तपुरवठा थांबविणे शक्य झालेले आहे. या तंत्राचा अवलंब केल्यास कोणताही तज्ज्ञ डॉक्टर शरीरातल्या ठराविक भागातल्या कॅन्सर गाठी जाळून टाकू शकतो. शस्त्रक्रिया सोपी झाल्यामुळे ती यशस्वी होण्याची शक्यता वाढते, डॉक्टरांचा वेळ वाचतो आणि रुग्णांच्या वेदनाही कमी होतात.”

“सर्वच रुग्णांसाठी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीद्वारे निदान व उपाय करणे शक्य असते असे नाही. त्यासाठी गायडेड बायोप्सीद्वारे सगळ्यात आधी निदान करावे लागते. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीद्वारे उपाय शक्य आहे असे वाटल्यास पायाच्या शिरेतून बारकी नळी ट्यूमरपर्यंत पोचवली जाते. म्हणजेच शरीराची चिरफाड न करता ट्यूमरपर्यंत पोचता येते. त्यानंतर तेथीलच पार्टीकल्सच्या आधारे ब्लॉकेज निर्माण करून ट्यूमरला होणारा रक्तपुरवठा शस्त्रक्रियेपुरता थांबविला जातो. ट्यूमर्सवर शस्त्रक्रिया करणे शक्य नसेल तर हा रक्तपुरवठा कायमस्वरुपी बंद केला जातो. रेडिओफ्रिक्वेन्सी अँब्लेशन तंत्राद्वारे ट्यूमरचा भाग तापवून जाळला जातो. त्यामुळे जरी तो ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे शरीराच्या बाहेर काढणे शक्य झाले नाही तरी त्याची वाढ मात्र थांबते. काहीवेळा त्या भागापुरते अँल्कोहॉल इंजेक्ट करून छोटे ट्यूमर मारता येतात,” असेही डॉ. मुटाटकर यांनी सांगितले.

 

इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये

–    शरीरात कमीतकमी छेद घ्यावा लागतो.

–    अंशतः भूल देऊन उपचार शक्य होतात

–    रुग्ण लवकर (बऱ्याचदा एका किंवा दोन दिवसात) घरी जाऊ शकतो

–    पारंपरिक शस्त्रक्रिया व उपचारपद्धतीमधील त्रास आणि वेदना कमी होतात